Click here to go back
आश्चर्यांची खाण - महाराष्ट्र
Image of a calender
Sept 24, 2021
Logo of a Customer
दिग्विजय भामरे

महाराष्ट्राची भाषा व संस्कृती समृद्ध आहेतच परंतु येथील निसर्गही तितकाच समृद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आढळतात जी पर्यटकांना अक्षरशः अचंबित करतात. त्यातील काही म्हणजे लोणार चा सरोवर, नाणेघाट चा उलट धबधबा, नागोबाचे शेटफळ, कास पठार व पुस्तकांचे गाव - भिलार. महाराष्ट्राच्या या चमत्कारिक घटकांबद्दल वाचण्याकरिता खालील लेख अवश्य वाचा!

लोणार सरोवर

Image of a man working on his laptop

लोणार सरोवर, पाहताच डोळे दिपणारा विशाल पाण्याचा साठा. पण हा बाकीच्या सरोवरांपेक्षा वेगळा आहे. मानवाचे प्रामुख्याने आकर्षण ठरलेल्या अवकाशातून आलेल्या उल्केमुळे बनलेला हा तलाव. याची बनण्याची घटना ही खूपच रोमांचक आहे. प्लायस्टोसीन युगामध्ये एक प्रचंड मोठा जवळपास उपग्रहाच मानता येईल अश्या वस्तूने पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडक झाली, ती धडक एवढी मोठी होती की 1.2 कि. मी. व्यासाचा मोठा खड्डा निर्माण झाला. तो उल्कापिंड बेसाल्ट पासून बनला असावा असे मानले जाते करण बेसाल्ट चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळते. मानव परग्रहावर जाण्यासाठी एवढे प्रयत्न करत असताना त्याचाच एक तुकडा आपल्याला पृथ्वीवरच पाहायला मिळणे एक मोठे आश्चर्यच आहे.

उलटा धबधबा - नाणेघाट

Image of a man working on his laptop

निसर्गाची किमया अशी आहे की जी कधी कधी विज्ञानालाही कोड्यात पाडते. असेच निसर्गाचे एक अद्भुत लेणे म्हणजे 'उलटा धबधबा'. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नाणेघाट येथे वाहणारा हा उलटा धबधबा. प्रामुख्याने पावसाळी ऋतूत वाऱ्याच्या उच्च दाबामुळे या धबधब्याचे पाणी खाली न पडता उलटे वरच्या दिशेने वाहते, यामुळेच या धबधब्याला उलटा धबधबा असे नाव पडले. नाणेघाट कोकण आणि जुन्नरला जोडणारा एक नैसर्गिक दुवा आहे. प्राचीनकाळी व्यापारी मालाची वाहतूक नाणेघाट मार्गे होत असे. धबधब्याप्रमाणेच येथील लेण्याही पर्यटकांचे आकर्षण ठरते. मुख्य लेण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील राजांच्या प्रतिमांचे अवशेष आढळून येतात. राणी नागनिका हिने केलेल्या वैदिक यज्ञांचा प्रदीर्घ शिलालेख येथील भिंतींवर ब्राम्ही लिपीत कोरलेले आहेत. अशा या अद्भुत नाणेघाटाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ' म्हणून घोषित केले आहे.

शेतफळ

Image of a man working on his laptop

"तुका म्हणे सर्प विंचू नारायण
वंदावे दुरून... शिवू नये !!
पुराण ग्रंथ असो वा वेद सगळीकडे मनुष्य आणि नाग यांच्यात असणाऱ्या घनिष्ट संबंधाचे पुरावे आपणास पाहायला मिळतात. समुद्रात खोलवर नागलोक आजही अस्तित्वात आहे अशा भाकडकथा आपण सर्वांनी ऐकल्याच असतील, तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील खऱ्याखुऱ्या नागलोक मानल्या जाणाऱ्या शेतफळ गावाबद्दल. सोलापूर जिल्ह्यातील हे गाव "नागोबाचे शेतफळ" या नावाने ओळखले जाते. येथील नाग व माणसांमधील पाहायला मिळणारे ऐक्य नक्कीच तुम्हाला चकित करेल. या गावात प्रत्येक घरात तुम्हाला नाग पाहायला मिळतील. अगदी लहान वयापासूनच येथील मुलांना नागोबाशी ओळख करून दिली जाते. त्यांचे हावभाव, देहबोली याबद्दल शिक्षण दिले जाते. नाग किंवा सापाला मारणे हा इथे कायदेशीर गुन्हा आहे, असे केल्यास सौम्य शिक्षा व दंड आकारला जातो. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेले गावातील शिवकालीन नागनाथ मंदिर हे आजही जागृत देवस्थान आहे असे सांगण्यात येते. दरवर्षी नागपंचमीला येथे स्वतः नागदेवता प्रकट होतात असे मानले जाते. अत्युच दर्जाची परदेशात निर्यात केली जाणारी केळी या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अश्या अदभूत आणि मनोरम्य ठिकाणाला एकदा नक्कीच भेट द्यावी!!!!

कास पठार

Image of a man working on his laptop

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले. कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २० किलोमीटर अंतरावर सातारा वनविभागाच्या अंतर्गत आहे. कास पठार इथे अत्यंत सुंदर फुले पाहायला मिळतात. कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते सज्जनगड किल्ला आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. तलावाच्या जवळच भांबवली वजराई धबधबा आहे. हा भारतातील सर्वात उंच आहे. कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे.या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. कास च्या शेजारीच जावळीचे घनदाट वनक्षेत्र असल्याने येथे अनेक निसर्गाचे प्रयोग पाहायला मिळतात.

पुस्तकांचे गाव - "भिलार"

Image of a man working on his laptop

मुंबई-महाबळेश्वर येथील 'स्ट्रॉबेरीचे गाव' अशी ओळख असलेले, परंतु ४ मे, २०१७ पासून 'पुस्तकांचे गाव' अशी बिरुदावली मिरवणारे गाव म्हणजेच भिलार होय. प्रस्तुत गाव हे कोकण प्रदेशाच्या प्रारंभीस वसलेले आहे व कोकणी निसर्ग सौंदर्याने पूर्णतः नटलेले आहे. भिलार हे महाबळेश्वर पासून सोळा, तर पाचगणी पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. भिलार हे भारतातील पहिले, तसेच ग्रेट ब्रिटनमधील हे-ओन-वे गावानंतर जगातील दुसरे पुस्तकांचे गाव आहे. या गावाला महिन्याला सरासरी 5000 लोक भेट देतात. या गावातील चाळीस घरात पुस्तकांचे जग उभारण्यात आले आहे व 50 हजारा पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षा, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तकं, कादंबरी(दोन दालने),चरित्रे-आत्मचरित्रे(दोन दालने) अशी विविध दालने या गावात आहेत. ही दालने म्हणजेच सर्व सुखसोयींनी व पुस्तकांनी युक्त अशी घरे आहेत. या गावातील जवळपास शंभर घरांमध्ये निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेत निसर्गाच्या व पुस्तकांच्या सानिध्यात वेळ व्यतीत करण्यासाठी भिलार हे एक अतिशय चांगले पर्यटन स्थळ आहे. तसेच भिलार गावाची प्रेरणा घेत जम्मू-काश्मीरमधील बांदिपूर जिल्ह्यातील आटवाटू या गावात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्यात आले आहे.